Monday, September 29, 2008

Outsourced- Won an award in the best 4 stories in the Saptahik Sakal competition

6056 – 6056 – 6056 – 6056. सुमारे अनंत वेळा हा नंबर डायल करुनही पुन्हा पुन्हा आपला तोच “बीप-बीप” आवाज ऐकून मॅन्डी वैतागून गेला होता. असं अजून किती वेळा होतंय याची वाट बघत, आपल्या मागे येऊन, सुमित केव्हाच उभा राहिला आहे याचं भानसुद्धा त्याला नव्हतं. शेवटी धीर संपला आणि हसणंही आवरता येईना, तेव्हा मॅन्डीच्या डाव्या दंडावर थाप मारुन सुमित म्हणाला,
“चिल मॅन्डी चिल, काय करतो आहेस तू?”
“अरे यार, साला गेला तासभर मी हेल्प डेस्कचा नंबर फिरवतो आहे. माहिती नाही काय भानगड आहे. लागतच नाहीये.”
“कसा लागेल? तू नंबर नेमका कुठे फिरवतो आहेस, पाहिलंस का?”
ओह...शीट. आत्ता कुठे मॅन्डी भानावर आला. डेस्कवरच्या फोनचा रिसिव्हर कानाला लावून मॅन्डी चक्क त्याच्या कम्प्युटरच्या की-बोर्डवरचे आकडे फोन नंबर म्हणून डायल करत होता. असं कितीही वेळ करत राहिलं, तरी जगातला कोणताच फोन कधीच लागणार नव्हता. सुमितने मॅन्डीचा फोन घेतला आणि 6056 फिरवून त्याच्या हातात दिला. त्याच्या मेलबॉक्समध्ये झालेल्या एका “मेजर झोल”ची तक्रार हेल्प डेस्कवर नोंदवून मॅन्डीने फोन ठेवला आणि तो तडक कॉफी पिण्यासाठी म्हणून उठला.
वाफाळलेल्या कॉफीचे दोन घोट आणि एक सिगारेट हे संयुगच कदाचित आता आपल्याला भानावर आणेल असं वाटून त्याने पॅन्ट्रीचा रस्ता पकडला. “सी.सी.डी.” मधून खास विकत घेतलेला, त्याच्या आवडीचा कॉफीचा कप त्याने डेस्कवरुन उचलला. नक्कीच आज काहीतरी गंडतंय. आजपासून का, गेले काही दिवस काहीच धड होत नाहीये. सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर मंदार गोडसे यांचं डोकं काही ठिकाणावर नाही. विचाराच्या कोणत्याशा तंद्रेमध्येच तो पॅन्ट्रीकडे गेला असावा. कारण पॅन्ट्रीमध्ये पोचल्या पोचल्या त्याने हातातला रिकामा कप, तसाच गरम करण्यासाठी ओव्हनमध्ये टाकून दिला. 30 सेकंदाची वेळ ठरवून दिली आणि तो तसाच कॉफी गरम होण्याची वाट बघत बसला. “बीप-बीप” आवाजानंतर त्याने कप ओव्हनमधून बाहेर काढला आणि कॉफी पिण्यासाठी ओठाला लावल्यावर त्याच्या लक्षात आलं, कप मध्ये कॉफी नव्हतीच. शेवटी पुन्हा एकदा वैतागून कॉफीची कल्पना तशीच सोडून तो जागेवर येण्यासाठी निघाला.
दोन “S1P1” दर्जाचे डिफेक्ट्स गेले तीन दिवस त्याच्या जादूई स्पर्शाची वाट बघत होते.
S1P1- S म्हणजे “सिव्हियरिटी” अर्थात “चिताजनक स्थिती” आणि P म्हणजे “प्रायोरिटी” अर्थात “तातडीची गरज”. 1 ते 5 ची मोजपट्टी घेतली, तर त्या मोजपट्टीवर या S आणि P मध्ये सर्वधिक महत्वाचे असणारे कोणतेतरी दोन डिफेक्ट्स त्याच्या नावावर नोंदलेले होते. अजून दोनच दिवसांचा वेळ उरला होता आणि हे कोडं उलगडण्याचा कोणताही मार्ग अजून त्याला दिसलेला नव्हता. गेल्या दोन वर्षांत मिळून सुमारे 20 संगणक अभियंत्यानी अनेक वेळा या “कोड” ला हात लावला असेल. त्यांच्यातल्या कोणीतरी केव्हातरी करुन ठेवलेली चूक निस्तरायची जबाबदारी आज मंदारवर आली होती. ही चूक त्याला नुसती निस्तरायची नव्हती, तर हजारो ओळींच्या या “कोडबेस” मध्ये चूक नेमकी कुठे झाली आहे हे शोधून काढून मग ती दुरुस्त करायची होती. हा विचार चालू असतानाच, मॅन्डीने “कोड" मध्ये पुन्हा एकदा बुडून जायचं ठरवलं. अंगातल्या जॅकेटचं हुड त्याने डोक्यावर ओढलं, त्यावर कॅप घातली, आणि त्याच्यावर हेडफोन्स लोटून दिले. असं केलं, की जबरदस्त एकतानतेने काम होतं, असा त्याचा ठाम समज होता. कानावर ढाण ढाण आदळणारं मेटल या प्रकारचं पाश्चात्य संगीत आणि समोरच्या पडद्यावर सरकत जाणारा कोड...आज गणित सोडवूनच उठायचं असा मॅन्डीचा निश्चय.. असा साधारण तासभर गेला आसावा.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++
अचानक कोणत्यातरी धक्क्याने मॅन्डीला या विचारांच्या तंद्रीतून बाहेर काढलं. त्याच्या मोबाईलच्या व्हायब्रेटरने त्याला जागं केलं होतं. फोनवरचा नंबर दिसत नव्हता कारण फोन बहुधा आंतरराष्ट्रीय होता.
“नमस्कार सर, मी मंदार गोडसेंशी बोलू शकते का?”
“बोलतोय”, असं म्हणता म्हणताच हा फोन कट करण्याची तयारी मंदारने मनातल्या मनात सुरू केली होती. आजच्या दिवसात क्रेडिट कार्ड विक्रीसाठी त्याला आलेला हा दुसरा फोन होता. फक्त आश्चर्य हे होतं, की ही मुलगी चक्क मराठीमध्ये बोलत होती.
“सर, आमच्या कंपनीने आपली एका ऑफरसाठी निवड केली आहे. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर मी ही ऑफर सांगू का?”
अरे यार... सारखं सारखं कोणालातरी क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन देत जाऊ नका रे...असं मनातल्या मनात म्हणून, “सॉरी मला क्रेडिट कार्ड नको आहे”, असं फोनवर सांगून मॅन्डीनं फोन कट केला. परत ही कटकट नको म्हणून फोन बंद करुन ठेवण्याची तयारी करत असतानांच पुन्हा एकदा तोच फोन आला. आता मात्र त्याचं डोकं सटकलं.
फोन घेऊन त्या मुलीचं बोलणं ऐकण्यापूर्वी, त्यानेच बोलायला सुरूवात केली,
“मी तुम्हाला मगाशीच सांगितलं आहे, मला क्रेडिट कार्ड नको आहे. आता पुन्हा तुम्ही मला फोन केलात, तर.....”
मॅन्डीच्या या रागाचा आपल्या आवाजावर जराही परिणाम होऊ न देता, फोनच्या दुसऱ्या बाजुची मुलगी तितक्याच मधाळ आणि गोड आवाजात म्हणाली,
“हा फोन क्रेडिट कार्डसाठी नाहीये सर. आपला राग मी समजू शकते. पण आपण थोडाच वेळ मला दिलात, तर माझ्या मते मी आपल्याला उपयोगी अशाच एका ऑफरबद्दल आपल्याशी बोलू इच्छिते. सांगू का?
ह्या वेळी मॅन्डीचा स्वर थोडा बदलला आणि का कोण जाणे पण त्या मुलीचं बोलणं ऐकावं असं त्याला वाटलं.
मॅन्डीने काही न सांगताच, त्याचा होकार गृहीत धरुन, त्या मुलीने बोलायला सुरूवात केली.
“धन्यवाद सर. माझं नाव प्रीती. मी अमेरिकेतल्या डब्ल्यू एन्ड एल कंपनीमधून बोलते आहे. आमच्याबद्दल तुम्ही कदाचित फारसं ऐकलं नसेल. कारण आम्ही आमच्या या इंडस्ट्रीमधली खूपच नवीन आणि खरं म्हणजे सध्या तरी एकमेव कंपनी आहोत. अमेरिकन कंपन्यांसाठी भारतात संगणक क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक हे आमचे प्रमुख ग्राहक. आमच्या डेटाबेस मध्ये असलेल्या माहितीनुसार आपण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आता गेली सात वर्ष काम करताय. या क्षेत्राची भारतामध्ये किती झपाट्याने प्रगती झाली, हे तुम्हाला सांगायला नकोच. अमेरिकेमध्ये मुख्य कार्यालयं असणाऱ्या मोठ मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनी भारतामध्ये आपली संशोधन आणि विकास अर्थात रिसर्च एन्ड डेव्हलपमेंट कार्यालयं उघडली. त्याचबरोबर, बी.पी.ओ अर्थात बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग आणि आता तर, एल. पी. ओ. अर्थात लीगल प्रोसेस आऊटसोर्सिंग साऱख्या संगणाकावर आधारित क्षेत्रातसुद्धा, भारतामधले निरनिराळे व्यावसायिक भाग घेऊ लागले आहेत. भारतातले वैद्यकीय व्यावसायिक, भारतातले वकील, भारतातले वास्तुरचनाकार... अशा सर्वांसाठीच अमेरिकन ग्राहकांसाठी काम करण्याची एक उत्तम संधी आता निर्माण झालीय..... आपण ऐकताय ना सर?” खात्री करुन घेण्यासाठी प्रीतीने विचारलं.
“हो.. हो.. अर्थात. मी नीट ऐकतो आहे.”
खरं तर, ही सगळी कथा ही पोरगी आपल्याला नेमकी का सांगते आहे याचा विचार जरी मॅन्डी करत होता, तरीही तो तिचं बोलणं अतिशय लक्षपूर्वक ऐकत होता. ही आपल्याला एखादी जॉब ऑफर देते आहे की काय असा एक विचार त्याच्या मनात चमकून गेला. पण तिचं बोलणं पूर्ण ऐकण्यापूर्वी काहीच निष्कर्ष न काढणं बरं, असं ठरवून त्यानं पुन्हा फोनकडे कान दिला.
“धन्यवाद. तर भारतामध्ये, अमेरिकासाठी काम करणारे हे व्यावसायिक अतिशय कष्टाचं काम करतात. अमेरिकन वेळेमध्ये काम करतात. त्यामुळे अक्षरशः रात्रीचा दिवस करुन काम करतात. या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधीमुळे त्यांच्या घरात सुबत्ता आलेली असल्याने, शरीराच्या आणि मनाच्या थकव्याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करुन काम करतात. प्रसंगी, या कामाच्या नादात आणि कामाच्या दडपणामुळे त्यांचं कौटुंबिक आयुष्यसुद्धा पणाला लागतं. या सगळ्याचा ताण त्यांच्यावर सतत असतो. काम आणि वैयक्तित आयुष्य – वर्क आणि लाईफ - यांचा समतोल साधता साधता त्यांची ओढाताण होते. आणि आता याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवरही होऊ लागला आहे. त्यांची कार्यक्षमता हळू हळू कमी होऊ लागली आहे. अमेरिकेला भारतातल्या या सर्व हुशार व्यावसायिकांची गरज आहे आणि म्हणूनच त्यांचा “वर्क-लाईफ बॅलन्स” सांभाळण्याचं काम आता अमेरिकेने स्वतःकडे घेण्याचं ठरवलं आहे.”
“वर्क – लाईफ- बॅलन्स”...अच्छा “डब्ल्यू एन्ड एल कंपनी” इथून आलं आहे तर. मॅन्डीचा बल्ब पेटला. प्रीती बोलत होती, तो शब्द न शब्द खरा असल्यामुळे त्याला तिच्या बोलण्यात आणि त्याच्या ऐकण्यातही व्यत्यय नको होता. पण अमेरिकेने हे काम स्वतःकडे घेतलंय म्हणजे नेमकं काय केलंय आणि त्याला या कंपनीकडून मिळत असलेली ऑफर नेमकी काय आहे या बद्दलचं त्याचं कुतुहल आता शीगेला पोचलं होतं.
“मला नेमकं लक्षात नाही आलं,” मॅन्डीने न राहवून विचारलं.
“मी सांगते सर. आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये असे अनेक प्रश्न असतील, ज्यांच्यामुळे तुमचं काम नीट होण्यामध्ये अडथळे येत असतील. उहारणार्थ, मुलाचा प्रवेश नेमका कोणत्या शाळेमध्ये घ्यायचा, आपण नवीन घर घेतलेलं आहे आणि आता आपण बायको बरोबर त्या घरी राहायला जाणार आहोत, हे आपल्या आई-बाबांना कसं सांगायचं, यावर्षी गुंतवणू नेमकी कुठे करायची, इथपासून ते घरी जाताना आज कोणती भाजी घेऊन जायची, इथपर्यंतचे लाखो विचार दिवसभर तुमच्या मनात येत असतील. हे सगळे विचार एकीकडे मनात चालू असताना, तुम्ही कामामध्ये संपूर्ण लक्ष देऊ शकतच नसणार. त्यामुळे तुम्हालाच त्रास होत असणार. तर तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी, तुम्ही तुमचे काही “विचार” आमच्याकडे “विचार करण्यासाठी “ “आऊटसोर्स” करु शकता.”
मॅन्डीचं डोकं आता चालेनासं झालं होतं. माझे विचार मी आऊटसोर्स करायचे? काहीतरी विचित्र बोलते आहे ही मुलगी. खरं म्हणजे कित्येक प्रश्नांवर आपल्याला सारासार वगैरे विचार करायलाच लागू नये आणि कोणीतरी दुसऱ्यानेच आपल्यासाठी काही निर्णय घ्यावेत अशी गुप्त इच्छा त्याच्या मनात अलकिडे कित्येक वेळा येऊन गेली होती. पण असं करायला खरंच कोणी तयार होईल हे त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
आपलं बोलणं एकून संपूर्णतः भंजाळलेल्या मॅन्डीच्या चेहऱ्यावर उमटलेलं भलं मोठ्ठं प्रश्नचिन्ह वाढता वाढता वाढून थेट अमेरिकेमध्ये फोनवर बोलत असलेल्या प्रीती पर्यंत जाऊन पोचलं असावं कारण त्याच्या उत्तरार्थ ती लगेच म्हणली,
“मला कल्पना आहे, तुमचा गोंधळ झाला आहे. पण भारतातल्या, पुणे, दिल्ली, बंगलोर मधल्या, काही निवडक संगणक व्यावसायिकांसाठी आम्ही आमची ही सेवा 15 दिवस मोफत देण्याचं ठरवलं आहे. तुम्ही पंधरा दिवस तुमच्या काही प्रश्नांवर विचार करण्याचं काम आमच्याकडे आऊटसोर्स करुन पहा आणि त्या पंधरा दिवसांत तुमचा आमच्या सेवांवर विश्वास बसला, तर तुम्ही आमचे वार्षिक वर्गणीदार होऊ शकता.”
हे काहीतरी भलतंच निघत होतं. हे खरं आहे, की कोणीतरी आपली चेष्टा करतंय याचीही खात्री होत नव्हती. माझा विचार तुम्ही करणार म्हणजे काय, तुम्हाला कसं कळणार कशाचा विचार करायचा ते, तुम्हाला माझे सगळे प्रश्न सांगणं कसं शक्य आहे. तुम्ही अमेरिकेत...मी इकडे. छे. अशक्य आहे हे सगळं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही तो विचार केलात, तरी तुम्ही तो विचार नीट करताय की नाही याचा विचार माझ्या मनाला सतत सतावत राहील, त्याचं काय? तुम्हाला आऊटसोर्स केल्यावर माझ्या मनातून तो विचार हद्दपार कोण आणि कसा करणार? की तुम्ही ज्या प्रमाणे भारताला काही प्रोसेसेस आऊटसोर्स करुन नंतर निर्धास्त होता आणि केवळ आधी ठरवून दिलेल्या कालमर्यादेनुसार त्या त्या वेळी त्या त्या गोष्टींचे टप्पे गाठले जाताहेत की नाही, याची खात्री करत राहता, तसं करायचं? असे लाख प्रश्न खरं म्हणजे मनात येत होते. पण यातला एकही प्रश्न प्रीतीला न विचारता,
“पण तुम्ही माझी निवड का केलीत? आणि तुम्ही मराठी कसं काय बोलताय?” हेच दोन येडछाप सारखे प्रश्न मॅन्डीनं विचारुन टाकले.
“आमच्याकडे निवडीचं सुद्धा एक विशेष तंत्र आहे, सर. गुगल कंपनीशी आमचा करार झाला आहे. गेलं वर्षभर आमचे संशोधक यावर संशोधन करताहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये, गुगलवर तणाव व्यवस्थापन, वेळेचं नियोजन, किंवा तत्सम विषयांवर माहिती मिळवण्यासाठी ज्या संगणक व्यावसायिकांनी शोध घेतला आहे, त्यांचा शोध आम्ही आमच्याकडे डेव्हलप झालेल्या विशेष क्रॉलर्सच्या आधारे घेतला. खरं म्हणजे असे लाखो लोक निघाले. पण त्या यादीमधूनही काही जणांची निवड आम्ही लकी ड्रॉ च्या आधारे केली आणि त्यामध्ये तुमचं नाव निघालं.”
“I am the chosen one” आज आपण घातलेल्या “तंत्रा”च्या टी-शर्टवरची कॅच लाईन एकदम मान वर काढून आपल्याकडे वाकुल्या दाखवत बघू लागल्यासारखं मॅन्डीला वाटलं आणि फारच हसू आलं, पण प्रीती पुढे बोलतच राहिल्यामुळे त्यानं स्वतःचं हसू आवरलं.
“...आणि भाषोबद्दल विचाराल, तर प्रत्येक माणूस आपापल्या मातृभाषेमध्ये विचार करतो. आमच्या ग्राहकांना आमच्याशी संवाद साधायला मोकळेपणा वाटावा आणि मुख्य म्हणजे, त्यांचा विचार, त्यांच्या मातृभाषेतच व्हावा म्हणून आम्हाला भारतीय भाषांचं विशेष प्रशिक्षण दिलं आहे. खरं म्हणजे माझं नावंही प्रीती नाही...पामेला आहे. पण तुमच्यासाठी मी प्रीतीच. खरं तर मला हे सांगायची परवानगी नाही, पण आपल्याला नीट समजावं म्हणून सांगते आहे.... तर, तुमच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी आम्ही तुमच्या प्रोजेक्टवर एका मनुष्याची नियुक्ती पूर्ण वेळ करु. त्याचा प्रोजेक्ट प्लॅनही आम्ही तुम्हाला दाखवू. शिवाय ती व्यक्ती काही कारणाने रजा असल्यास त्याच्या जागी काम करण्यासाठी आमच्या कडे “बॅक-अप” सुद्धा असणारच. बॅक-अप म्हणून काम करणाऱ्या व्यकीला सुद्धा तुमच्या प्रश्नांबद्दलचं संपूर्ण “नॉलेज-ट्रान्सफर” व्यवस्थितपणे करण्याची जबाबदारीही आमचीच.”
मॅन्डीच्या चेहऱ्यावरचे भाव झटाझट बदलू लागले. दरम्यानच्या काळात आपल्या जागेवरुन उठून तो स्मोकिंग झोनमध्ये दाखल झालेला होता. धुराची वर्तुळं हवेत सोडत असतानाच, आपण नक्कीच ही ऑफर स्वीकारणार आहोत, याची खात्री तर त्याला झालेलीच होती. त्यामुळे आता त्याने अधिक उपयुक्त प्रश्न विचारायला सुरूवात केली,
“मला एक सांगा, तुम्हाला आऊटसोर्स करण्यासाठीचे विचार मी तुम्हाला कोणत्या स्वरुपात द्यायचे, म्हणजेच माझा इनपुट कसा असणार?”
“तुम्ही आम्हाला देण्याचा इनपुट दोन प्रकारे असू शकतो.... पण सॉरी, त्याआधी मी तुम्हाला एक सांगायचं विसरलेच. तुमच्या कामाची सुरूवात करण्यापूर्वी आम्ही तुमची संपूर्ण माहिती तुमच्या अकाऊंटमध्ये फीड करुन ठेवणार. तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात आहात. त्यामुळे तुम्हाला बॅक-एंड आणि युझर इंटरफेस बद्दल माहिती असेलच. कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये, ते वापरणाऱ्या मनुष्याला वेगवेगळे पर्याय दिसतात. ही झाली युझर-इंटरफेस. त्या पर्यायांमध्ये ती व्यक्ती जी माहिती भरते, त्या माहितीच्या आधारे ते सॉफ्टवेअर तुम्हाला काही उत्तरं देतं, त्या उत्तराला लागणारी तर्कमीमांसा – प्रोग्रामिंग- जिथे केलं जातं, ते बॅक-एंड. तर आम्ही सुद्धा याच प्रकारे काम करतो. साधारणपणे कोणालाही सतावरणारे प्रश्न, हे उपल्बध पर्यायांपैकी कोणता निवडायचा याचेच प्रश्न असतात. प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये जो विचार करतो आणि त्याला अनुषंगिक जे निर्णय घेतो, ते त्याच्या पूर्वायुष्यामध्ये घडलेल्या काही घटनांच्या आधारे घेतो असा आमच्या संशोधकांचा विश्वास आहे. म्हणजेच प्रत्येकाचं प्रोग्रॅमिंग एका विशिष्ट प्रकारे झालेलं असतं. त्यामुळे आम्ही तुमच्या प्रश्नांचा विचार करताना, त्याचे हे बॅकएंड्स तपासून बघायचा प्रयत्न करु. एकदा तुमचा कोडबेस समजला आणि नेमकी चूक कुठे आहे हे सापडलं, की प्रश्न झटक्यात सुटतोच.”
आता मात्र मंदार गोडसे एकीकडे खूप प्रभावितही होत होता आणि दुसरीकडे अमेरिकेच्या स्वार्थीपणाला शिव्याही टाकत होता. सुरूवातीपासूनच, खऱ्या अर्थाने मेंदू आणि सर्जनशीलतेच्या वापराची गरज असणारी कामं स्वतःकडे ठेवून, गधेमजुरीची कामं अमेरिकेने भारताकडे पाठवली. सॉफ्टवेअर हमालांची एक मोठ्ठीच्या मोठ्ठी फळी तयार केली इथे. आणि आता त्यामध्ये राबून राबून थकायला झालेल्या भारतातल्या संगणक व्यावसायिकांची कार्यक्षमता म्हणे कमी होते आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा, मदतीस धावून आल्याच्या खास अमेरिकन सवयीनुसार, अमेरिकाच अशी काहीतरी फंडू सेवाही आपल्याला देते आहे. या सगळ्यावर हसावं की रडावं?
प्रीतीने या संदर्भात बोललेली काही वाक्य मंदार गोडसेच्या या विचारसाखळीमुळे सुटली, पण तरी तिच्या बोलण्याचा अर्थ त्याला लावता आला.
ती म्हणत होती, “पहिला पर्याय- मॅन्युअल आहे. तुम्ही सरळ आमच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या अकाऊंटमध्ये, तुमच्या आऊटसोर्स केल्या जाणाऱ्या विचारांची सविस्तर माहिती देऊ शकता. तुमचा नेमका प्रश्न सुमारे 30 शब्दांमध्ये, त्याची कारणं, त्याचा उगम नेमका केव्हा झाला याची ढोबळ माहिती, त्याचे परिणाम, आणि तुम्ही या प्रश्नाचा विचार नेमका कोण-कोणत्या निकषांवर करु इच्छिता हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी भरता येईल.”
अच्छा म्हणजे, मी इनपुट कसा द्यायचा याचे पर्याय ती सांगत होती तर.... मंदारच्या लक्षात आलं.
“आणि दुसरा पर्याय म्हणजे तुमच्यासाठी आम्ही ही प्रक्रिया ऑटोमॅटिक करु शकतो. एक सेंटिमीटर बाय एक सेंटिमीटर च्या आकारचं एक चिपसदृश साधन आम्ही तुमच्याकडे ठेवायला देऊ. ते तुम्ही तुमच्या डाव्या दंडावर एक दिवस घातलंत, तर नेमके कोणते विचार तुम्हाला त्रास देताहेत आणि कशाच्या आऊटसोर्सिंग ची तुम्हाला गरज आहे, याचा एक सविस्तर रिपोर्ट आम्ही तयार करु आणि त्यानुसार कामाला लागू.”
मंदारला मेट्रिक्सची आठवण झाली. काहीतरी फारच विचित्र, परग्रहीय असं काहीतरी त्याच्या मनाला चाटून गेलं. प्रीती अजूनही बरंच काही बाही बोलत राहिली. पण मंदारची विचारचक्र आता वेगळ्याच दिशेला फिरू लागली होती. आपण ही ऑफर स्वीकारली असल्याचं फक्त त्याने तिला सांगितलं आणि स्वतःचा इ-मेल आय.डी.तिला दिला. अकाऊंट उघडण्यासाठी लागणारी सर्व माहिती त्यावर कळवण्यात येईल, असं सांगून आणि मंदारने तिला दिलेल्या वेळासाठी त्याचे अदबशीर आभार मानून प्रीतीने फोन संपवला.
फोन संपल्यापासूनचा संपूर्ण दिवस मंदारने काहीही काम न करता घालवला. एक भलं मोठं स्वगत त्याच्या मनामध्ये सुरू होतं. आपल्याला त्रासदायक असे सगळे विचार आता आपल्यासाठी दुसरंच कोणीतरी करणार, ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी आहे? आणि माझ्यासारखा माणूस ही ऑफर स्वीकारायला कसा तयार झाला? की केवळ हे मोफत आहे, म्हणून चान्स घ्यावा असं वाटलं आपल्याला? विचारांचं हे आऊटसोर्सिंग केल्यावर माझं काय होणार? माझ्या मनात त्रासदायक विचार येणार नाहीत? पण नेमके कोणते विचार मला त्रास देतात?
फावला वेळ घालवण्यासाठी कोणता छंद निवडावा, त्याला किती वेळ द्यावा, ताण कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा व्यायाम करावा, लग्नाच्या वाढदिवसाला बायकोला नेमकं काय करुन खूष करावं इथपासून ते निवडणुकीमध्ये मत कोणाला द्यावं, सतत होत असणाऱ्या बॉंबस्फोटांबद्दल स्वतःची नेमकी भूमिका काय असावी, राज ठाकरे तरुणांनी उद्देशून बोलत असलेलं सगळ बरोबर की चूक, डॉलरची रुपयांमधली किंमत कमी कमी होत असताना, रुपयाची किंमत वधारली म्हणून खूष व्हावं की डॉलर घसरला म्हणून दुःखी होऊ....हे असं कितीतरी मला त्रास देत राहातं. मग आता हे सगळं कोणी अमेरिकन माणूस माझ्यासाठी ठरवणार?
हे स्वगत सुरू असतानाच, कुठून तरी एक मोठ्ठा स्पॉट-लाईट आपल्यावर पडल्याचा भास मंदारला झाला आणि अचानक त्या प्रकाशामध्ये त्याला त्याच्या भोवती काहीतरी वेगळंच दिसायला लागलं. दहा वर्षांपूर्वीची काही चित्र...त्या चित्रांमध्ये होतं त्याचं शहर, शहरातली माणसं, त्यांचे पोशाख, त्यांच्या मनोरंजनाच्या कल्पना, त्यांची घरं... हे सगळं सेकंदभराच्या आत डोळ्यासमोरुन तरळून गेलं आणि तीच सगळी त्याच्या आसपासची माणसं त्याला आजच्या दिवशी दिसली...कोणा अमेरिकन माणसाने घडवल्यासारखी....त्याचेच टि.व्ही.चॅनल्स बघणारी, त्याच्यासारखाच पोशाख करणारी, त्याच्यासारख्याच रहाणीमानाची आकांक्षा करणारी, त्याच्यासारख्याच किंबहुना त्याच्याच देशातल्या घराची स्वप्न बघणारी...काय फरक आहे? आत्ता सुद्धा कोणत्याही प्रकारचं विचारांचं आऊटसोर्सिंग न करताही आपण तसेच तर होऊ घातलोय.....
++++++++++++++++++++++++++++
दुसऱ्या दिवशी इ-मेल्स बघितल्यावर अपेक्षेप्रमाणे मंदारला प्रीतीची इ-मेल मिळाली. नोंदणीची सविस्तर माहिती त्यामध्ये होतीच. त्यानुसार मंदारने “डब्ल्यू एन्ड एल” च्या वेब-साईटवर जाऊन स्वतःची शक्य तेवढी माहिती दिली आणि त्याला त्रास देणारा पहिला प्रश्न त्याने या अमेरिकन कंपनीला “विचार करण्यासाठी” आऊटसोर्स केला, त्यांना अपेक्षित असणाऱ्या साच्यामध्येच:
नेमका प्रश्न (कमाल 30 शब्द):
मॅक-डोनल्ड पासून माझ्या आयुष्यात शिरलेल्या अमेरिकेच्या वैचारिक वसाहतवादाचा मला त्रास होतोय. यापासून माझी सुटका मी कशी करुन घेऊ? की याला पर्याय नाही?
प्रश्नाची लक्षणे:
वाण्याच्या दुकानातून आणायची, तेच सामान माझी आई सुपर मार्केटमधून खरेदी करायला लागली. विचार न करता लक्ष्मी रोडवरुन कपड्यांची खरेदी करणारा मी रिबॉक, नाईकेशिवाय टी शर्ट्स घालणं टाळायला लागलो. मित्रांना देण्याच्या पार्टीसाठी मॅक-डी शिवाय दुसरा पर्याय सुचेनासा झाला. इथली निवडणूक, इथलं राजकारण, इथले सण यांवरची चर्चा निरस वाटायला लागली, पण अमेरिकेला जाणाऱ्या मित्रांच्या व्हिसा मिळवण्याच्या चर्चेमध्ये मात्र भयंकर रस वाटू लागला. ही सगळीच लक्षणं, अमेरिकेच्या वसाहती माझ्यासारख्या लाखोंच्या मनात, मेदूत, विचारांत तयार होऊ लागल्याची आहेत.
परिणाम:
माझ्या राहाणीमानामध्ये झालेले हे सगळे बदल सुरुवातीला आवडले होते. पण आता माहिती नाही का, पण या सगळ्याचा त्रास होतोय. इथे घडणाऱ्या कोणत्याच चांगल्या गोष्टीवर, चांगल्या चळवळींवर, चांगल्या लोकांवर विश्वास वाटेनासा झाला आहे. इथे काही चांगलं घडूच शकणार नाही अशी खात्री होऊ लागलीय. माझं बोलणं, माझे शब्द, त्या शब्दांमागची विचारसूत्र...बहुधा आऊटसोर्स झाली आहेत...तुम्हालाच...अमेरिकेला.
++++++++++++++++++++++++++++
हा प्रश्न “डब्ल्यू एन्ड एल” ला आऊटसोर्स केल्यानंतर का कोण जाणे... डोकं एकदम रिकामं रिकामं वाटलं.. अलिकडच्या दहा वर्षात, कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे जागोजागी उगवलेले अनेक प्रश्न उगीचंच निकालात निघाल्यासारखे वाटले. आपल्या नावावर असलेला एक मोठ्ठा S1P1 डिफेक्ट एकदम दुसऱ्याच्या नावावर टाकल्यावर कसं वाटेल, अगदी तसंच काहीसं त्याला झालं. आणि एक भला मोठ्ठा श्वास घेऊन, त्याच्या अमेरिकन कंपनीसाठी भरपूर कार्यक्षमतेने काम करायला मॅन्डी पुन्हा एकदा सज्ज झाला.